गुरुकुलाबद्दल प्राथमिक माहिती

Ayurved Vyaspeeth    21-Jun-2023
Total Views |

आयुर्वेद व्यासपीठ ही गेल्या २५ वर्षांपासून आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये “कृण्वन्तो विश्वं स्वस्थम्।“ या उद्देश्याने कार्यरत असलेली संघटना आहे. सेवा, संशोधन, शिक्षण व प्रचार या चतुःसूत्रीच्या आधारे विविध पातळ्यांवर आयुर्वेद व्यासपीठाचे काम सुरु आहे. आयुर्वेदातील विद्यार्थी, शिक्षक, चिकित्सक व अशा अन्यही घटकांना एकत्र आणणे व त्याद्वारे त्यांचे प्रश्न सोडवत, त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत आयुर्वेद हे जागतिक पातळीवर प्रथम दर्जाचे वैद्यकशास्त्र प्रस्थापित करणे हा व्यासपीठाच्या कामाचा गाभा आहे. याच उद्देश्याने आयुर्वेद व्यासपीठ वेळोवेळी विविध कार्यक्रम, उपक्रम यांचे आयोजन करत असते.

चतुःसूत्रीपैकी “शिक्षण”संबद्ध उपक्रमांचा केंद्रबिंदू हा निश्चितच आयुर्वेदाचा विद्यार्थी आहे. या विद्यार्थीदशेमध्येच आयुर्वेद शिक्षणाचा पाया असलेल्या ग्रंथांचे अध्ययन कसे करावे, हे बारकाईने शिकणे बऱ्याचदा राहून जाते. बहुतांशी विद्यार्थ्यांना आपल्याला मूळातून आयुर्वेद कळावा याबद्दलची ओढ असते, मात्र ग्रंथांच्या अध्ययनाबद्दल योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास विद्यार्थी आयुर्वेदीय चिकित्सक होण्याचे स्वप्न पाहणे सोडून देतात. याच अडचणीवर मात करण्यासाठी संघटनात्मक प्रयत्नांचा एक भाग म्हणजे आयुर्वेद व्यासपीठाद्वारे नियोजित “गुरुकुल”.

मूळात आयुर्वेदीय ग्रंथांचे व्यवस्थित अध्ययन केल्यास पदरी काय पडते? तर –

  • दोष, धातु, मल यांच्या चष्म्यातून शरीर, स्वास्थ्य, रोग यांना पाहण्याची दृष्टी तयार होते. यामुळेच आयुर्वेदीय पद्धतीने रोगनिदान करण्याची क्षमता प्राप्त होऊन चिकित्सेमध्ये यशस्वीता मिळण्याची संभावना वाढत जाते. आयुर्वेदामधील अनेक ज्येष्ठ वैद्यांनी हाच मार्ग पत्करला होता हे त्यांच्या लिखाणातून स्पष्टपणे कळते.
  • निदानपंचक, त्यातही हेतूंचा अभ्यास हा व्याधीच्या समूळ नाशासाठी आवश्यक असलेली बाब आहे. सध्याच्या काळामध्ये जेव्हा रुग्ण अन्य आयुर्वेदाकडे मूळातून बरे व्हायला येतात, तेव्हा हेतूज्ञानाशिवाय ते साध्य होऊ शकत नाही. तसेच आयुर्वेदीय दॄष्ट्या व्याधीसंप्राप्ति मांडायला शिकल्याशिवाय विविध वनस्पती, कल्प, पंचकर्मे व अन्यही कर्म यांची योग्य योजना करता येत नाही. हे सर्व ग्रंथांखेरीज अन्यथा शिकणे अशक्य आहे.
  • नवनवीन नावांनी वेगवेगळे रोग हे प्रचलित होत असताना आपल्याच सिद्धांतांचा वापर करून त्यांच्यावर कशी मात करायची हेही ग्रंथांमध्ये सापडते.

अतः विद्यार्थ्यांच्या मनातील ग्रंथांबद्दलची भीती दूर करून वाचनाबद्दल रुची उत्पन्न करणे, सवय लावणे, शंका-समाधान करणे व अर्थात त्यांना आयुर्वेदीय चिकित्सक बनण्यासाठी प्रेरित करणे या उद्देश्याने आयुर्वेद व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठीच्या ’गुरुकुला’चे नियोजन करत आहे. यापूर्वी याच हेतूने आयोजित वैद्यांसाठीच्या गुरुकुलाचे चार भाग पूर्णही झाले आहेत.

हा निवासी उपक्रम असून यामध्ये आयुर्वेदातील मूळग्रंथांपैकी एका ग्रंथामधील विशिष्ट भागाचे वैद्यांकडून अध्यापन केले जाते. अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी लागणारा आवश्यक कालावधी निश्चित करून तितक्या दिवसांच्या निवासी गुरुकुलाचे नियोजन केले जाते. या अभ्यासक्रमामध्ये –

  • मूळ ग्रंथांतील अध्यायांचे सूत्रशः अध्यापन
  • विशिष्ट टीकेचे वाचन व त्याद्वारे टीका वाचायला शिकवणे
  • पाठांतर
  • विषयाच्या अनुषंगाने अनौपचारिक चर्चा
  • रुग्णानुभव
  • प्रश्नोत्तरे इत्यादिंचा अंतर्भाव अपेक्षित असतो.

यासाठी तीन-तीन दिवसांच्या कालावधीसाठी तीन-तीन अध्यापकांचा गट गुरुकुलस्थानी मुक्कामी असतील. म्हणजे १८ किंवा त्याहूनही अधिक गुरुवर्यांचा दीर्घ सहवास मिळण्याची ही नामी संधी असणार आहे.

या उपक्रमातील द्वितीय गुरुकुल ’तृतीय वर्ष बी.ए.एम्.एस्.’च्या (डिसेंबर २०२३ मध्ये विद्यापीठाच्या परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या) विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जाणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षेनंतरच्या कालावधीमध्ये हे गुरुकुल घेतले जाईल. याचा कालावधी १८ दिवसांचा असेल. त्यासाठीचा अभ्यासक्रम ’अष्टांगहृदय निदानस्थान व चिकित्सास्थान – संपूर्ण’ व ’टीका-वाचनार्थ – अष्टांगहृदय सूत्रस्थान १३ वा अध्याय’ असा असेल. यासाठीचे काही बारकावे पुढीलप्रमाणे –

  • प्रवेश संख्या – ५० विद्यार्थी
  • स्थळ – रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर, मुंबई
  • अध्यापनाचे माध्यम – मराठी
  •  कालावधी - २० फेब्रुवारी ते ८ मार्च २०२४

वाग्भटाने निदानस्थानामध्ये कायचिकित्सेतील सर्वात महत्त्वाच्या रोगांच्या निदानपंचकाची मांडणी त्याच्या खास "सारतरोच्चय" पद्धतीने केली आहे, तसेच चिकित्सास्थानामध्ये चरक व सुश्रुतातील वैशिष्ट्यांची खुबीने निवड करुन त्याभोवती स्वयंप्रज्ञेने प्रसंगी नवीन मांडणी केली आहे. सर्वांनाच आयुर्वेदाचा शास्त्रीय व्यवहार करता यावा, त्यासाठी आवश्यक तो सोपेपणा त्याच्या वर्णनामध्ये आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच या अत्यंत महत्त्वाच्या विषयाचे अध्ययन आदर्श पद्धतीने करण्याची संधी आयुर्वेद व्यासपीठ हे आपल्यासमोर गुरुकुल-रूपाने घेऊन येत आहे. 


 
अधिक माहिती साठी संपर्क करा [email protected]